Wednesday, September 30, 2009

. . . . जावू नका


माझ्या हसण्यावर जावु नका,
माझ्या सहजतेवर जावु नका;
बोलायला लागल्यावर,
माझ्या असण्यावर जावु नका

माझ्या रुसण्यावर जावु नका,
माझ्या रागावर जावु नका;
भळ-भळुन वहाणार्या ,
माझ्या रक्तावर जावु नका

माझ्या दू:खावर जावु नका,
माझ्या अश्रुंवर जावु नका, ;
एकदा रुमाल दिल्यावर,
त्याच्या भिजन्यावर जावु नका

माझ्या चेहर्यावर जावु नका,
माझ्या निरागसतेवर जावु नका;
खरं बोलायला लागल्यावर,
माझ्या उद्धटपणावर जावु नका

__________________ मृगजळ
______________ ३१ ऑगस्ट २००९

Saturday, September 12, 2009

कोणीतरी हवंय…..


कोणीतरी हवंय,
माझ्या अबोल्याला समजुन घेणारं
डोळ्यातले भाव अलगद टिपणारं १

कोणीतरी हवंय,
मला सावरणारं
ठेचाळलोच जर कधी, तर आधार देणारं २

कोणीतरी हवंय,
मायेनं जवळ करणारं,
रक्ताळलेल्या मनावर मायेची फुंकर घालणारं ३

कोणीतरी हवंय,
माझी आठवण काढणारं,
मला फक्त पहाण्यासाठी धडपडणारं ४

कोणीतरी हवंय,
क्षणभर माझ्यासाठी रेंगाळणारं,
माझ्या वाटेकडे डोळे लावुन बसणारं ५

कोणीतरी हवंय,
मला साथ देणारं,
मनातल्या खोल कप्प्यात मला जपुन ठेवणारं ६
कोणीतरी हवंय.........

मृगजळ
(१०-१२-२००७)

Thursday, September 10, 2009

नको असं हे अबोल रहाणं…..


नको असं हे अबोल रहाणं
मनातल्या शब्दांच वादळ,
कधि ओठांवर येवु न देणं
नको असं हे अबोल रहाणं

एका कटाक्षासाठीही आतुर असताना,
पहाणंही टाळणं,
नको असं हे अबोल रहाणं
एकमेकांना पुर्ण करण्याचि आस आहे,

तरिही आपलं असं हे झुरणं,
नको असं हे अबोल रहाणं
गर्दीतही एकमेकांना शोधणं,
भेटीचं मात्रं जाणीवपुर्वक टाळणं,

नको असं हे अबोल रहाणं
खुप झालं एकमेकांना टाळणं
खुप झालं मनातल्या मनात झुरणं,
खरंच नको असं हे अबोल रहाणं

मृगजळ
(१२-२-२००८)

Tuesday, September 8, 2009

नातं मनाचं मनाशी, असंच फुलवायचं ||


एकमेकांच्या नजरेत,
एकमेकांना शोधायचं ;
भेटल्यावर पुन्हा,
एकमेकांत हरवुन जायचं ;
नातं मनाचं मनाशी, असंच फुलवायचं १

एकमेकांना भेटण्यासाठी,
आतुर असायचं ;
स्वप्नातही एकमेकांच्या
सोबत रहायचं ;
नातं मनाचं मनाशी, असंच फुलवायचं २

कधी कधी असंच,
लटकं लटकं रागवायचं ;
कधी कधी असंच,
खोटं खोटं भांडायचं ;
नातं मनाचं मनाशी, असंच फुलवायचं ३

स्वत:साठी जगणं,
विसरुन जायचं ;
एकमेकांनी एकमेकांशी,
एकरुप होवुन जायचं ;
नातं मनाचं मनाशी, असंच फुलवायचं ४
मनाच्या खोल गाभार्‍यात, हळुवार जपायचं

मृगजळ
२२-२-२००८

Sunday, September 6, 2009

प्रेम आहे …


प्रेम आहे …

तुझ्या हसण्यावर प्रेम आहे,
हसल्यावर गालावर खुलणार्‍या त्या खळीवरही प्रेम आहे

तुझ्या रुसण्यावर प्रेम आहे,
रुसल्यावर डोळ्यात उमटणार्‍या त्या थेंबावरही प्रेम आहे

तुझ्या लाजण्यावर प्रेम आहे,
गालावर रुळणार्‍या त्या केसाच्या बटेवरही प्रेम आहे

तुझ्या मोहक रुपावरही प्रेम आहे,
मनाचा ठाव घेणार्‍या त्या चोरट्या नजरेवरही प्रेम आहे

तुझ्या साधेपणावर प्रेम आहे,
स्वभावातल्या त्या सहजतेवरही प्रेम आहे

तुझ्या मनमोकळ्या बडबडीवर प्रेम आहे,
रुसुन धरलेल्या अबोल्यावरही प्रेम आहे

तुझ्या नकारावर प्रेम आहे,
नजर झुकवुन पापण्यांनी दिलेल्या होकारावरही प्रेम आहे

मृगजळ
(१०-०१-२००८)

का अशी आलीस ?

का अशी आलीस ?
ओठांवरचे शब्द,
मनातच गोठवुन गेलीस !

का अशी आलीस ?
अळवावरच्या थेंबासारखी,
क्षणभर सुख देवून साथ सोडून गेलीस !

का अशी आलीस ?
भग्न स्वप्नांमधे माझ्या,
रंगांची उधळण करुन गेलीस !

का अशी आलीस ?
क्षणभराची साथ देवून,
आयुष्यभराची आठवण देवून गेलीस !

का अशी आलीस ?
येताना मंद झुळुक होवून आलीस,
जाताना वादळात एकट्यालाच टाकुन निघून गेलीस !

का अशी आलीस ?
बेधुंद स्वप्नात माझ्या मी,
काळजाचा एक ठोका चुकवून गेलीस !

का अशी आलीस ???
___________________मृगजळ
________________ १२ मे २००९

Saturday, September 5, 2009

याचा अर्थ ऐसा नाही . . . . .

याचा अर्थ ऐसा नाही . . . . .

मी इ-मेल फॉरवर्ड करतो,
याचा अर्थ ऐसा नाही,
मला काही काम नाही;
कामात फोन करुन
व्यत्यय टाळण्यासाठी,
इ-मेलसारखे दुसरे साधन नाही

मी हसत असतो
याचा अर्थ ऐसा नाही,
माझं डोकं जाग्यावर नाही;
दु:खाचे प्रदर्शन करुन,
सांत्वनाचे शब्द मिळवण्यापेक्षा,
हसत राहणे वाईट नाही

मी सुखात असतो
याचा अर्थ ऐसा नाही,
दु:खात मी होरपळलो नाही;
दुसऱ्याला दु:खात खेचन्यापेक्षा,
एकट्याने होरपळणे चुकीचे नाही

सर्वांची खिल्ली उडवतो,
याचा अर्थ ऐसा नाही,
मला त्यांच्या भावनांची कदर नहीं;
खोटी समजूत घालून,
मर्जीत राहण्यापेक्षा,
खिल्ली उडवणे वाईट नाही

कट्ट्यावर टपोरिगिरी करतो,
याचा अर्थ ऐसा नाही,
की प्रेम मला समजत नाही;
प्रेम करुन कुणाला फसवण्यापेक्षा,
कट्ट्यावर शिट्ट्या मारणं,
टपोरिगिरीचे लक्षण नाही

पीजे मारून हसवतो,
याचा अर्थ ऐसा नाही,
की मला परिस्थितीचे गांभीर्य नाही;
तणाव निर्माण करण्यापेक्षा,
पीजे मारून हसवण्यात..
काही गैर नाही ...

याचा अर्थ ऐसा नाही......

__________________ मृगजळ
_________________२७ ऑगस्ट २००९ - ३१ ऑगस्ट २००९